लग्न म्हणजे दोन जीवांचे संगम. गेल्या काही काळात अनेकांच्या घरी साखरपुडा, लग्न यांसारखी मंगल कार्ये पार पडली आहेत. यात मराठी कलाकारही आघाडीवर आहेत. काही दिवसांपूर्वीच मानसी नाईक हिचे सुद्धा लग्न झाले. या कलाकारांमधील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा साखरपुडा काही आठवड्यांपूर्वी पार पडला होता. त्यावेळी त्या साखरपुड्याची आणि तिच्या अहोंची चर्चा होतीच. नुकतंच त्या दोघांच लग्नही झालंय. चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री आणि जाणून घेऊया दोघांची प्रेमकहाणी.
या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आहे सई लोकूर आणि आता लग्नानंतर ते झालंय, सई लोकूर-रॉय. होय प्रेक्षकांच्या लाडक्या सईचं लग्न नुकतंच २९ नोव्हेंबर रोजी झालंय. तिच्या पतीचं नाव तिर्थदीप रॉय असं आहे. सई आणि तिर्थदीप यांच्या साखरपुड्याची चर्चा सर्वत्र झाली होती. कारण सईच्या चाहत्यांसाठी हा एक सुखद पण अनपेक्षित धक्का होता. तसेच साखरपुड्या आधी सईने तिर्थदीप आणि तिचे काही फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. या फोटोत तिर्थदीप हे पाठमोरे होते, त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये त्यांच्याविषयी उत्सुकता होतीच. त्यांचं नाव कळल्यानंतर पुढे उत्सुकता होती ती या दोघांची भेट केव्हा आणि कुठे झाली या बाबत. तर सई आणि तिर्थदीप यांची भेट एका लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट मार्फत झाली. लॉक डाऊनच्या काळात प्रथमतः बोलणं सुरू झालं. दोघांनीही एकमेकांविषयी आदर आणि प्रेम ह्या भावना अगदी कमी कालावधीत आणि सहजगत्या व्यक्त केल्या. त्यांमुळे कमी कालावधी होऊनही आपण एकमेकांसाठी पूरक आहोत असं त्यांना ठामपणे वाटलं आणि त्यांनी आपापल्या आई-वडिलांसोबत एकत्र भेटायचं ठरवलं.
पहिल्याच भेटीत दोघांचा आणि घरच्यांचा होकार आला आणि पुढे काहीच दिवसात दोघांचा साखरपुडा झाला आणि नुकतंच म्हणजे २९ नोव्हेंबर २०२० ला दोघेही विवाहबद्ध झाले. हा विवाह सोहळा पार पडला तो सईच्या बेळगाव येथील घरी. या मंगल प्रसंगी सद्य परिस्थितीमुळे निवडक निमंत्रितांना आमंत्रण दिलं गेलं होतं. यात सईची बिग बॉस मराठी आणि नंतरच्या काळातली घनिष्ठ मैत्रीण मेघा धाडे यांचा विशेष सहभाग होता. निवडक निमंत्रित असले तरीही साखरपुडा आणि लग्न मात्र अगदी थाटात पार पडलं असं नक्कीच म्हणावं लागेल. लग्नाचे विविध विधी अगदी आनंदात आणि उल्हसित वातावरणात पार पडले. नावावरून लक्षात आलं असेलच की तिर्थदीप हे बंगाली आहेत. त्यामुळे काही लग्नविधींच्या प्रसंगी, सई आणि तिर्थदीप यांनी बंगाली पद्धतीने पोशाख परिधान केले होते. तर लग्नसमयी दोघांनीही अस्सल मराठमोळ्या पेशवाई पद्धतीचे पेहराव केलेले होते. सध्या हे नवं परिणीती जोडपं आणि त्यांचं लग्न हे सईच्या चाहत्यांमध्ये कौतुकाचा विषय ठरले आहेत.
सईला आपण सगळे विविध सिनेमे आणि खासकरून बिग बॉस मराठी च्या पर्वातील सहभागासाठी ओळखतो. अभिनयाव्यतिरिक्त ‘साज बाय सई’ हा तिचा स्वतःचा एक ब्रँड ही आहे. तिर्थदीप हे आय.टी. क्षेत्रात कार्यरत असून अमेझॉन सारख्या एका जगडव्याळ कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. खरं तर गेल्या काही महिन्यांपूर्वी एकमेकांना ते अगदी ओळ्खतही नव्हते. पण म्हणतात ना, लग्नगाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात. तसंच या गोड जोडीच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाकडे पाहून वाटतं. सध्या या जोडीवर चहुबाजूंनी कौतुक, प्रेम, आशीर्वाद यांचा वर्षाव होतो आहे. मराठी गप्पाच्या टीमकडूनही, या गोड जोडप्याला त्यांच्या लग्नाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि येत्या काळातील एकत्र यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)