Breaking News
Home / मराठी तडका / ह्या लोकप्रिय मराठी मालिकांचे चित्रीकरण कोणत्या ठिकाणी चालू आहे, पहा

ह्या लोकप्रिय मराठी मालिकांचे चित्रीकरण कोणत्या ठिकाणी चालू आहे, पहा

मनोरंजन क्षेत्रात आपण अनेक विविध कलाकृती पाहत असतो. त्यात कथानकांनुसार अनेक विविध गोष्टी बदलत असतात, खासकरून चित्रीकरण स्थळं. सध्या पौराणिक मालिकांची मांदियाळी आपल्याला आपल्या टीव्हीच्या पडद्यावर दिसून येते. तसेच गावाकडील कथानक असलेल्या अनेक मालिकाही सध्या चालू आहेत. त्यामुळे त्यांची चित्रीकरण स्थळं मुंबईसोबतच महाराष्ट्रात विविध ठिकाणी पसरलेली आहेत. आजच्या आपल्या या लेखातून आपण अशाच काही मालिका आणि त्यांची चित्रीकरण स्थळं, यांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करू.

१. दख्खनचा राजा जोतिबा :

सध्या महाराष्ट्रभर लोकप्रियेतचे नवनवीन कळस गाठणारी एक मालिका म्हणजे दख्खनचा राजा जोतिबा. ही कोठारे विजन्स तर्फे निर्मित केलेली मालिका आहे. महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि इतर कोठारे कुटुंबीय कलाक्षेत्रात त्यांच्या भव्य दिव्य प्रोजेक्ट्स साठी प्रसिद्ध आहेत. या लोकप्रियतेस साजेसा असा या मालिकेचा सेट आहे. हा सेट कोल्हापुरातील फिल्मसिटी मध्ये उभारला गेलेला आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी महेशजींनी या भव्य सेट विषयीची माहिती आणि कोल्हापूरशी निगडित असलेल्या जुन्या आठवणी आपल्या मुलाखतींतून जागवल्या होत्या.

२. आई माझी काळूबाई :

अलका कुबल यांचं नाव आलं की जसं त्यांनी अभिनित करलेल्या चित्रपटांची नावं समोर येतात तशीच त्यांनी निर्मित केलेल्या चित्रपटांची नावं सुद्धा समोर येतात. यातील एक चित्रपट हा त्यांनी देवी काळूबाईंवर बनवला होता. काही काळाने देवी काळूबाईंवर मालिका करावी, असं त्यांच्या मनाने घेतलं आणि मग सध्या चालू असलेली आई माझी काळूबाई ही मालिका त्यांनी निर्माण केली. या मालिकेचं चित्रीकरण स्थळ हे सातारा जिल्ह्यात आहे. मालिकेतील कथानकाला साजेसा असा विविध लोकेशन्स असलेला भव्य सेट उभारलेला आहे.

३. आई कुठे काय करते :


आई कुठे काय करते हि मालिका गेले वर्षभर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेचे उत्तम कथानक आणि मालिकेतील कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय ह्या मालिकेच्या जमेच्या बाजू. हि मालिका देशमुख कुटुंबावर आधारित असून, हे कुटुंब मोठं असल्याचे मालिकेत दिसत आहे. त्यामुळे हे कुटुंब एक मोठ्या घरात वास्तव्यास असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर तुमच्या माहितीसाठी ‘आई कुठे काय करते’ ह्या मालिकेचे चित्रीकरण हे ठाण्यातील ‘समृद्धी’ बंगल्यामध्ये चालू आहे.

४. बाळूमामाच्या नावाने चांगभलं :

संत बाळूमामा यांचं जीवनचरित्र प्रेक्षकांपुढे मांडणारी मालिका म्हणजे बाळूमामाच्या नावाने चांगभलं. यात बाळूमामा राहत असलेलं गाव, त्यातील त्यांचं घर, तसेच बाळूमामा प्रवास करत असतानाची स्थळं हे अगदी कथानकानुसार चपखल वाटतं. तसेच कलाकारांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा ही तितकीच साजेशी असते. या मालिकेचा सेट हा मुंबईतील चित्रनगरी येथे उभारलेला आहे. या सेट वरील मानवनिर्मित वास्तू आणि आजूबाजूचा निसर्ग यांमुळे अगदी सुयोग्य असे वातावरण या मालिकेतील कथानकानुसार तयार होते.

५. स्वराज्य जननी जिजामाता :

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन थोर महापुरुषांना घडवणाऱ्या जिजाऊ आईसाहेबांच्या जीवनावर आधारित मालिका म्हणजे स्वराज्य जननी जिजामाता. या मालिकेतून जिजाऊंच्या दैदिप्यमान आयुष्याचा प्रवास मांडण्याच्या प्रयत्न मालिकेच्या माध्यमातून केला जातो आहे. नुकतेच या मालिकेतील कथानक काही वर्षे पुढे आलेले दाखवले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या भूमिकेत अनुक्रमे खा सदार डॉ. अमोलजी कोल्हे आणि लोकप्रिय अभिनेत्री नीना कुळकर्णी हे दोन दिगग्ज दिसत आहेत. या ऐतिहासिक मालिकेचे चित्रीकरण मुंबईतील चित्रनगरीत करण्यात येते आहे. शिवकालीन संरचना असलेल्या वास्तू, त्यातील विविध स्थळं या सेट वर उत्तमरीतीने उभारल्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका शिवकालाचे उत्तम दर्शन घडवते.

६. सुख म्हणजे नक्की काय असतं :

सुख म्हणजे नक्की काय असतं हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच गाजत आहे. महेश कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेली हि मालिका प्रेक्षकांना खूप आवडत असून मालिकेला चांगलाच टीआरपी मिळत आहे. मालिकेतील कलाकार हे शूटिंग मध्ये घडणाऱ्या गंमती जमती सोशिअल मीडियावर शेअर करत असतात. ह्या मालिकेचे चित्रीकरण हे मुंबई मध्ये होत आहे.

या ऐतिहासिक कथानक असलेल्या मालिकांसोबतच काही मालिका या शहरांमध्ये घडणाऱ्या तर काही गावाकडे घडणाऱ्या आहेत. त्या त्या मालिकांनुसार त्यांचे चित्रीकरण स्थळ बदलत असते. जसे की ‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेतील कथानक मुंबईत घडत नाही. त्यामुळे या मालिकेचं शूटिंग हे सांगली येथील शहरी तसेच गावाकडच्या विविध लोकेशन्स वर होत असतं. तसेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचं शूटिंग नाशिक येथे सूरु आहे. तर काही मालिकांचं शुटींग हे मुंबई आणि जवळपासच्या भागात चालू आहे. ‘माझा होशिल ना’, ‘रंग माझा वेगळा’ ही याची काही उदाहरणं.

वर उल्लेखलेल्या विविध मालिकांविषयी मराठी गप्पाच्या टीमने वेळोवेळी वैविध्यपूर्ण लेखन केलेलं आहे. आपण वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शन मध्ये जाऊन मालिकेचं नाव टाईप करून सर्च केलं असता, आपल्याला आमच्या टीमने लिहिलेले लेख मिळतील. आपल्या वेळेबद्दल धन्यवाद !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *