गेल्या काही दिवसांत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदल यांच्याबाबतीत बऱ्याच बातम्या वाचनात आल्या. भारताच्या नौदलाचा ३ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२० या काळात जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांच्या नौदलासोबत युद्ध सराव चालू होता. तसेच ४ नोव्हेंबरच्या रात्री तीन नवीन राफेल विमानं भारताच्या भूमीवर दाखल झाली. तसेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला गिलगीट बाल्टीस्तानच्या प्रदेशप्रश्नावरून भारत सरकारने दिलेला दणका असो. भारताचे वृद्धिंगत होणारे सामरिक सामर्थ्य यांतून लक्षात येते. सोबतच एका अशा लष्करी अधिकाऱ्याची यावेळी आठवण होते, ज्यांचा आत्मा आजही भारतीय सीमेचं आणि सैनिकांचं संरक्षण करत असतो, अशी मान्यता आहे. त्यांच्या या मरणोत्तर सेवेमुळे पुढे त्यांना आदराने बाबा अशी उपाधी मिळाली.
या भारतीय लष्करातील अधिकाऱ्याचं नाव आहे कॅप्टन ‘बाबा’ हरभजन सिंघ. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९४६ रोजी पंजाब प्रांतातील सद्राना या गावात झाला. आपलं शिक्षण पूर्ण करून ते पुढे लष्करात रुजू झाले. हे साल होतं १९६५. अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांनी लष्करात पदार्पण केलं. पण अवघ्या काही वर्षांत, काळाने त्यांच्यावर घाला घातला. १९६८ साली एक मोहीम फत्ते करत असताना ते एका हिमनदीत पडले. प्रवाह एवढा जोरदार होता कि ते त्यासोबत वाहून गेले. हि बातमी कळल्यावर लष्कराने शोधमोहीम हाती घेतली. पण डोंगरमाळ आणि खिंडिंच्या या प्रदेशात हा शोध अवघड होता. तब्बल तीन दिवस तो चालला. पण हाती काही लागेना. तेव्हा हरभजन सिंघजी आपल्या एका सहकाऱ्याच्या स्वप्नात आले आणि त्यांनी त्याला त्यांचा मृतदेह वाहून जिथे गेला आहे तिथलं ठिकाण सांगितलं अशी नोंद आहे. पुढे लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पार्थिव शरीर नष्ट झालं तरीही त्यांचा आत्मा, भारतीय सैनिकांचं आणि भारतीय सीमेचं संरक्षण करतो असं काही लष्करी अधिकाऱ्यांच्या अनुभवावरून सांगितलं जातं. भारतीय सैनिकांच्या स्वप्नात येऊन पुढे होऊ घातलेल्या हल्ल्याची पूर्वसूचना त्यांच्या आत्म्याकडून मिळते असं काही सैनिक आपल्या आठवणीत सांगत. तसेच शिस्तप्रिय असलेले बाबा हरभजन सिंघजी आजही स्वतःचा गणवेश व्यवस्थित न ठेवणाऱ्या किंवा गस्त घालताना चूक करणाऱ्या सैनिकाच्या श्रीमुखात देतात अशी मान्यता आहे. लष्कराकडून त्यांच्या या सेवेसाठी त्यांच्या मरणोत्तरहि त्यांची लष्करी सेवा ग्राह्य धरली. तसेच त्यांना कॅप्टन पदापर्यंत बढती देण्यात आली. या त्यांच्या सेवा काळात आणि नंतरहि भारतीय लष्करातील सैनिक आणि अधिकारी यांच्याकडून त्यांच्या घरी नियमितपणे दर महिन्याला पैसे पोहोचवले जातात. तसेच त्यांच्या कार्यकाळात दर ११ सप्टेंबर या दिवसापासून काही दिवस सुट्टीहि दिली जाई.
या सुट्टीच्या काळात नथुला जवळ असणाऱ्या न्यू जलपायगुडी येथील स्टेशनहुन सुटणाऱ्या ट्रेनमध्ये त्यांच्या नावे विशेष आरक्षण केले जाई आणि तीन जवान या प्रवासात त्यांच्या चीजवस्तूंना त्यांच्या गावी असलेल्या घरी सोडून येत असत. त्यांच्या या प्रवासावर आधारित एक शॉर्ट फिल्म २०१८ साली बनवली गेली. तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा ‘बी.बी. के वाईन्स’चा भुवन बाम आणि लोकप्रिय अभिनेत्री दिव्या दत्ता यात होते. हा लेख लिहित असताना या शॉर्ट फिल्मला, फिल्मफेअरचा बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे आणि जवळपास सव्वा दोन करोड प्रेक्षकांनी हि शॉर्ट फिल्म पहिली आहे. या शॉर्ट फिल्मच्या शेवटी आपल्याला कॅप्टन “बाबा” हरभजन सिंघ यांच्या विषयीची एक छोटीशी चित्रफीत पहायाला मिळते.
आज कॅप्टन “बाबा” हरभजन सिंह हे भारतीय लष्करी जवानांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आदराच्या स्थानी आहेत. त्यांच्या स्मरणार्थ आज नथुला येथे मंदिर आहे. या ठिकाणी आजही त्यांच्या चीजवस्तूचं जतन केलेलं आहे. अनेक वेळेस या चीजवस्तू वापरलेल्या स्वरुपात आढळतात यावरून कॅप्टन “बाबा” हरभजन सिंह यांचं आजही इथे वास्तव्य असल्याचं मानलं जातं. इथे येणारे भारतीय सैनिक आणि लष्करी अधिकारी नेमाने त्यांच्या बद्दल आदर व्यक्त करतात. त्यांच्या बद्दल आदर असल्याचं अजून एक उदाहरण म्हणजे जवळपास जर कुठे भारत आणि चीनी लष्करी अधिकाऱ्यांची बैठक असेल तर एक खुर्ची कॅप्टन “बाबा” हरभजन सिंह यांच्यासाठी रिकामी ठेवली जाते असं सांगितलं जातं. त्यांना चीनी अधिकारीही मान देतात असं यावरून दिसतं. देहावसान होण्यापूर्वी अवघं २२-२३ वर्षांचं उणंपुरं आयुष्य कॅप्टन “बाबा” हरभजन सिंह यांना लाभलं. पण मृत्यनंतरही भारत मातेच्या सेवेत ते सदैव तत्पर राहिले असंच दिसतं. त्यांच्या या अविरत देशसेवेसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांना मानाचा मुजरा.
(Author : Vighnesh Khale)