गेल्या वर्षात सुरुवातीला लॉक डाऊन आणि एकूणच बदललेली परिस्थिती यांच्याशी जुळवून घेणं जरा अवघडच गेलं. पण एकदा न्यू नॉर्मल ला सरावल्यावर मात्र अनेकांगानी आपलं जीवन पुन्हा सुरळीत होताना दिसतं आहे. गेल्या वर्षीपासून सातत्याने होत असलेली लग्न आणि साखरपुडे हे याचं उत्तम उदाहरण. त्यात अगदी सेलिब्रिटीजही मागे नाहीत, हे आपण पाहिलं आहेच. अनेक सेलिब्रिटीज नी गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली तर काहींनी साखरपुडा उरकून घेतला. आता ज्यांनी साखरपुडा उरकून घेतला त्यांची लग्न लवकरच होणार आहेत. किंबहुना त्यांना सुरवातही झाली आहे आणि याची सुरवात या वर्षी झाली आहे ती सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रींच्या लग्नापासून.
आपल्याला आठवत असेल तर ९ नोव्हेंबर २०२० रोजी मराठी गप्पावर प्रकाशित झालेल्या लेखात आमच्या टीमने अभिज्ञा भावे आणि तिचा तेव्हाचा प्रियकर आणि आताच नवरा मेहुल पै या जोडीविषयी माहिती दिली होती. त्याच्या काही काळ अगोदरच ही जोडी अभिज्ञाच्या सोशल मीडिया पोस्ट्सतर्फे समोर आली होती. मेहुल आणि अभिज्ञा हे एकमेकांचे जुने मित्र. मेहुल कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असतात. काही काळापूर्वी त्यांनी एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त केलं आणि काही काळाने साखरपुडा झाला. साखरपुडा आणि लग्न या मधल्या काळात त्यांच्या मित्र मैत्रिणींच्या घरात त्यांचं केळवण झालं. यात अनेक सेलिब्रिटी मित्रमैत्रिणीही आघाडीवर होते. श्रेया बुगडे या तिच्या जिवलग मैत्रिणीचाही यात समावेश होतो. तसेच गेल्या काही काळापासून हे जोडपं, मित्र परिवारासोबत सातत्याने दिसलं. त्यात अगदी अभिज्ञा हिने काम केलेल्या मालिकेतील कलाकार ही होते. तसेच हे वर्ष सुरू झाल्यावर अभिज्ञा हिच्या लग्नाची लगबग वाढली. मग दररोज विविध विधींचे फोटोज सोशल मिडियावरती येऊ लागले. यात अभिज्ञा आणि मेहुल यांच्या घरची मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी यांची लगबग जाणवू लागली.
ग्रहमख, मेहेंदी हे विधी पार पडले. मनोरंजन विश्वातील अनेक नामवंतांनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. यात मिताली मयेकर-सिद्धार्थ चांदेकर, श्रेया बुगडे आणि निखिल शेठ, ओमप्रकाश शिंदे, मयुरी वाघ, इशा केसकर आणि ऋषी सक्सेना यांचा वावर अगदी नजरेत भरावा असा होता. हे सगळे अगदी मस्त मस्त पेहरावात स्वतः सजले होते. नवरा नवरीनेही अगदी राजेशाही पद्धतीचा पेहराव केलेला होता. आजूबाजूला सजावटही प्रसन्न अशी केलेली होती. संपूर्ण वातावरणात एक उत्साहाचा माहौल होता. अशा मंगल वातावरणात मंगलाष्टके म्हंटली गेली, अक्षता पडल्या आणि ही जोडी विवाहबद्ध झाली. त्यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या आहेतच सोबत सोशल मिडियावरतीही त्यांच्यावर चहुबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. या आनंदात मराठी गप्पाची टिमही सामील आहे. अभिज्ञा आणि मेहुल या नवपरिणीत जोडीला आमच्या टीमकडून पुढील आनंदी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.