Breaking News
Home / माहिती / ह्या २ कारणामुळे चिप्सच्या पाकिटात इतकी जास्त हवा भरलेली असते, बघा ह्यामागचे कारण

ह्या २ कारणामुळे चिप्सच्या पाकिटात इतकी जास्त हवा भरलेली असते, बघा ह्यामागचे कारण

शाळा आणि कॉलेजमध्ये असताना अनेक खाद्यपदार्थ खाण्याची आवड मुलांमध्ये असते. काळानुसार हे खाद्य पदार्थ बदलत जातात. जसं पूर्वी कैरीची फोड, सुकलेली बोरं, चिंचा असत. आजही काही मुलांमध्ये याची आवड दिसते. पण काळ बदलला आणि आवडीनिवडीसुद्धा. आता तर पॅकेटबंद खाद्यपदार्थ खाण्याकडे जास्त कल असतो. यातही या शाळकरी आणि कॉलेजच्या मुलांकडे असणाऱ्या पॉकेटमनीवर त्यांना भागवावं लागतं. त्यामुळे बाकी काहीही खावोत पण एक पदार्थ मात्र त्यांचा नेहमीच आवडीचा असतो, ते म्हणजे चिप्स. अर्थात मोठ्यांनाही या चिप्सचा फायदा होतोच. अनेक वेळेस प्रवास करताना पटकन काही तोंडात टाकायला मिळावं आणि भूक तात्पुरती शमवावी म्हणून या चिप्सना खाल्लं जातं. गेल्या काही काळात या क्षेत्रात अनेक परदेशी आणि भारतीय कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे.

ग्राहकांना लुभावण्यासाठी अनेक जाहिराती केल्या जातात. पण यामुळे ग्राहक आकर्षित होतातच ,असे नाही. अनेकांचं असं म्हणणं असतं कि आत तर हवाच भरलेली असते मग कशाला डोकं खाजवा. जे चिप्स मिळतील ते घ्या. त्यामुळे मग अनेक वेळेस कोणते फ्लेवर्स आहेत, हे पाहून निवड केली जाते. पण या पॅकेटमध्ये असणाऱ्या हवेविषयी तक्रार काही जात नाही. पण खरं सांगायचं तर चिप्सच्या पॅकेटमधली हि हवा महत्वाची असते. किंबहुना हि केवळ हवा नसते तर तो असतो नायट्रोजन गॅस. आता असं का? तर त्याची काही कारणे आहेत. पहिलं कारण जर चिप्स कोणत्याही गॅसविना भरल्यास, त्यांची हाताळणी करताना, वाहतूक करताना त्यांचे छोटे छोटे तुकडे होऊ शकतात. आतील वायुमुळे हवेचा काही प्रमाणात दाब बनून राहतो आणि प्रत्येक चिप्सचे तुकडे होत नाही. त्यामुळे चिप्स खाणाऱ्यांच्या मजेत अडथळे येत नाहीत.

तसेच दुसरे महत्वाचे कारण म्हणजे हवेतील ऑक्सिजन या वायुमुळे ऑक्सिडेशन हि प्रकिया होते. सदर प्रक्रियेमुळे जर चिप्स ऑक्सिजनच्या संपर्कात राहिल्यास चटकन खराब होण्याची शक्यता असते. याउलट जेव्हा हे चिप्स पॅकेटमध्ये नायट्रोजन गॅससोबत ठेवले जातात तेव्हा सदर प्रक्रिया होत नाही. त्यामुळे हे चिप्स काही ठराविक कालावधीच्या आत या पॅकेटमध्ये ताजे आणि सुरक्षित राहू शकतात. त्यांची चव बदलत नाही. हे चिप्स कारखान्यांतून बनून आपल्या पर्यंत येई पर्यंत ताजे राहावेत हा या मागचा विशेष उद्देश. एकूणच काय तर चिप्स खाणाऱ्या आपल्या ग्राहकांच्या उत्तम खाद्यानुभवासाठी कंपन्यांकडून हे पाउल उचललं जातं. अर्थातच जर एखाद्या कंपनीची जाहिरात उत्तम असेल पण आता चिप्सचा चुरा मिळाला तर आपोआप ग्राहकांच्या मनात या कंपनीच्या खाद्यपदार्थांविषयी अनास्था पसरू शकते. एखाद्या खाद्यपदार्थ कंपनीसाठी हे केव्हाही धोकादायकच. त्यामुळे चिप्सच्या पॅकेटमध्ये केवळ हवा असते ही तक्रार काही अंशी खरी असली तरीही त्यामागची कारणे ही वर सांगितल्या प्रमाणे आहेत, हे लक्षात घेणं ही महत्त्वाचं.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.