लॉक डाऊन थोडा शिथिल होत असताना आपल्या अनेक परिचितांनी साखरपुडे आणि लग्न पट्कन उरकून घेतल्याचं पाहिलं आहे. तर काही जणांनी ही शुभकार्ये पुढील वर्षी ढकलली असल्याचं ही कळलं असेल. आपल्या प्रमाणेच गेल्या काही काळात अनेक सेलिब्रिटीज हे साखरपुडा करताना दिसले. मराठी गप्पाच्या टीमने वेळोवेळी याबाबत लेख प्रसिद्ध केले होतेच. आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत अशा जोड्या ज्यांनी पुढील वर्षी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.
१. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर
गेले काही वर्षे एक कलाकार जोडी ही सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. त्यांचं एकत्र असणं हे त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आनंद देतं. अशी ही जोडी म्हणजे मिताली आणि सिद्धार्थ यांची. गेली दोन वर्षे ते रिलेशनशिप मध्ये आहेत. काही काळापूर्वी त्यांचा साखरपुडा संपन्न झाला होता. या वर्षी ते लग्नही करणार होते. पण को विड १९ मुळे त्यांनी हे शुभकार्य पुढील वर्षी ढकललं आहे.
२. अभिज्ञा भावे आणि मेहुल पै
फु बाई फु चं स्कीट असो वा मायरा ही व्यक्तिरेखा. अभिज्ञा ही नेहमीच उत्तम कलाकार म्हणून आघाडीवर राहीलेली आहे. तसेच तेजाज्ञा या आघाडीच्या ब्रँडची ती सह संस्थापक आहे. अशा या नव्या युगाच्या प्रयोगशील अभिनेत्रीने काही काळापूर्वी आपला जुना मित्र असलेल्या मेहुल पै यांच्यासोबत साखरपुडा केला. त्याआधी काही काळ त्यांचे एकत्र फोटोज पाहून तिच्या चाहत्यांना त्यांच्या प्रेमाची कल्पना आली होतीच. मेहुल हे एका कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपनीशी जोडले गेलेले आहेत. आपल्या करियरमध्ये स्थिरस्थावर होणाऱ्या या जोडीने २०२१ साली विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला असल्याचं कळतं.
३. रुपाली भोसले आणि अंकित मगरे
गेल्या काही काळापासून कलाक्षेत्रात एका नवीन जोडीविषयी चर्चा आहे. ही जोडी आहे रुपाली भोसले आणि अंकित मगरे यांची. रुपाली यांना आपण बिग बॉस मराठी, आई कुठे काय करते या कार्यक्रम आणि मालिकांसाठी ओळखतो. अंकित हे सुदधा मनोरंजन क्षेत्राशी निगडित आहेत. रुपाली आणि अंकित हे रुपाली यांच्या युट्युब चॅनेल वरून एकत्र कुकिंग करताना दिसले आहेतच. सोबत सुरेखा तळवकर यांच्या युट्युब चॅनेल वरील एका मुलाखतीतही ते एकत्र प्रेक्षकांसमोर आले होते. ही गोड जोडी २०२१ मध्ये लग्न करेल अशी बातमी सध्या कळते आहे.
४. सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर
अप्सरा आली म्हणत सोनाली महाराष्ट्राच्या घराघरात प्रसिद्ध झाली. अनेक सिनेमातून तिने उत्तम आणि वाखाणण्याजोगा अभिनय केला आहे. तसेच उत्तम नृत्यकौशल्यामुळे अनेक कार्यक्रमात परीक्षक म्हणूनही तिने भाग घेतलेला आहे. सध्याही डान्सिंग क्वीन या कार्यक्रमाच्या नवीन पर्वात ती परीक्षक म्हणून कार्यरत आहे. अशी या प्रेक्षकांच्या लाडक्या सोनालीने, काही काळापूर्वी कुणाल बेनोडेकर यांच्याशी साखरपुडा केला. कुणाल हे इंग्लंडस्थित भारतीय असून, कामानिमित्त दुबईला असतात. येत्या काळात म्हणजेच २०२१ साली हे दोघेही लग्नाच्या बंधनात अडकतील.
५. मानसी नाईक आणि परदीप खरेरा
गेल्या काही दिवसांपूर्वी मानसी नाईक या आपल्या आवडत्या अभिनेत्रीने तिच्या साखरपुड्याचे काही फोटोज तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तिच्या वाढदिवशी तिने परदीप खरेरा यांच्यासोबत असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्या सुखद धक्क्यानंतर तिचा साखरपुड्याची बातमी हा अजून एक सुखद धक्का होता. सध्या या जोडीवर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतो आहे. येत्या काळात म्हणजे २०२१ मध्ये ही जोडी विवाह बंधनात अडकेल अशी शक्यता आहे.
अशा प्रकारे मराठी मनोरंजन क्षेत्रात पुढील वर्षी ‘यंदा कर्तव्यं आहे’ अशी चिन्हे आहेत. येत्या काळात, या नावांमध्ये अजून कोण कोणती नावे सामील होतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सर्व जोड्यांना त्यांच्या सांसारिक वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !