Breaking News
Home / मराठी तडका / ह्या ७ मराठी अभिनेत्रींनीं केले आहे हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम, दोघी तर बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्री आहेत

ह्या ७ मराठी अभिनेत्रींनीं केले आहे हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम, दोघी तर बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्री आहेत

मराठी माणूस म्हटलं, कि अभिनय आणि राजकारण हे त्याचे आवडीचे विषय. बोलण्यासाठीही आणि कृतीसाठी हि. पण असं म्हणतात कि, त्यातही नाटकाविषयी आपल्याला जरा जास्त प्रेम. पण म्हणून चित्रपट सृष्टीतलं आपलं योगदान काही कमी नाही. अगदी दादासाहेब फाळके यांनीच सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या पासून ते आज पर्यंत. अनेक गुणी कलाकार चित्रपटांमध्ये काम करते झाले. अगदी हिंदी चित्रपटात आज सुद्धा मराठी कालकार स्वतःचा आब राखून आहेत. यात दिग्दर्शक आहेतच तसेच अनेक अभिनेते आणि अभिनेत्री पण आहेत. अशाच काही गुणी मराठी अभिनेत्रींचा हिंदी मनोरंजन जगतातील प्रवासाचा आढावा.

अमृता खानविलकर :

मराठी चित्रपटसृष्टीतली एक गुणी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. वाजले कि बारा म्हणत रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अभिनेत्रीने हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार कामाच्या जोरावर स्वतःच भक्कम स्थान तयार केलय. नुकत्याच झालेल्या ‘खतरो के खिलाडी’च्या सीजन मध्ये ती आपल्याला दिसली. या आधीही तिने हिंदी प्रोजेक्ट्स केलेले आहेतच. २०१६ मध्ये आलेल्या ‘राजी’ चित्रपटात ती मुनिराच्या भूमिकेत दिसली होती. २०२० मधे तिची भूमिका असलेला ‘मलंग’ हा चित्रपटहि प्रसिद्ध झाला आहे. नृत्यासाठी खास प्रसिद्ध असलेल्या अमृताने मराठी नृत्य स्पर्धेमधे भाग घेतलाच होता आणि नंतर आपल्या पती सोबत ‘नच बलीये’ मधेही भाग घेतला होता. मराठी आणि हिंदी मध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्या कलाकारांमध्ये अमृता याचं नाव आघाडीने घ्यावं लागेल.

तेजस्वी प्रकाश :

खतारो के खिलाडी च नाव घेतलं तर नुकत्या पार पडलेल्या सीजन मधली तेजस्वी प्रकाश आपल्याला आठवत असेलच. ती आहे मुळची मराठी. आपल्या जिगरबाज स्टंट मुळे तिने शो चे सूत्रसंचालक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या कडून वाहवा मिळवली. इतर स्पर्धकांनीही तिच्या जिद्दी वृत्तीचं वेळोवेळी कौतुकच केलं. शेवटच्या एका अगदीच खतरनाक स्टंट मुळे दुखापत होऊन तिला बाहेर जावं लागलं. अन्यथा तीच या सीजन ची विजेती होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता, इतकं जबरदस्त असं काम तिने केलं होतं. पेशाने अभियंता असलेल्या तेजस्वी चा येत्या काळात मराठी मधे सुद्धा चित्रपट येण्याची शक्यता आहे.

राधिका आपटे :

नेटफ्लिक्स म्हंटल कि हमखास एक चेहरा आपल्या डोळ्या समोर उभा राहतो. तो म्हणजे राधिका आपटे. आपल्या अभिनयाबरोबरच बोल्डनेस मुळे ती चर्चेत राहिली. पण तिची ओळख केवळ इथपर्यंतच मर्यादित नाही. अभिनयाबरोबरच ती एक कुशल नृत्यांगना आहे. तिने पुण्यामधे आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुण्यामध्ये वास्तव्यास असताना रोहिणी भाटे यांच्याकडे कथक चे धडे तब्बल आठ वर्ष गिरवले आहेत. तसेच लंडन येथे जाऊन कंटेम्पररी नृत्य प्रकारचे धडे घेतले आहेत. त्याच्या आधी तिने कामे केली होती पण एकूणच त्यातून म्हणावी अशी प्रसिद्धी मिळाली न्हवती. लंडन मधे असताना तिची भेट झाली तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी. मग दोघेही भारतात परतले. आणि मग तिथून परतून तीने आपला प्रवास पुन्हा सुरु केला तो कधीही मागे वळून न बघण्यासाठी. तिच्या अभिनयाचं आपल्याला जसं कौतुक असायला हवं तसच अजून एका गोष्टीचा अभिमान सुद्धा. ती गोष्ट अशी कि राधिकाने स्वतःला केवळ मराठी आणि हिंदी पर्यंत मर्यादित ठेवलेलं नाही. तिने तामिळ, तेलगु, बंगाली आणि अर्थात इंग्रजी भाषेत काम केलंय. आणि तेही नाटक, सिनेमा, शॉर्ट फिल्म या सगळ्या माध्यमांमध्ये. आजच्या ग्लोबल युगात मराठी मध्ये काम करता करता जागतिक स्तरावर स्वतःची कला पोहोचवणे हि काळाची गरज आहे. उभरत्या कलाकारांना यातून प्रेरणा मिळत असेल हे नक्की.

माधुरी दीक्षित :

नृत्याचा विषय निघावा आणि माधुरी दीक्षित याचं नाव येऊ नये असं होणं अशक्यच. त्यांनी केलेल्या नृत्यावर आजही अनेक अभिनेत्री फिदा असतात. स्वतःला त्यात झोकून देऊन माधुरी यांच्या सारखं नृत्य करण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी त्या मान्य करतात, माधुरीजींनी जे काम करून ठेवलंय, ते सर्वोत्तम आहे. आणि केवळ नृत्यच नाही तर अभिनयासाठी सुद्धा त्या प्रसिद्ध आहेतच. हिंदी चित्रपटातील अनिल कपूर, नाना पाटेकर, सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर यांसारख्या दिग्गजांबरोबर काम करताना नेहमीच स्वतःच्या अभिनयाची छाप सोडून ठेवली आहे. ९० च्या दशकातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना होत असे. फोर्ब्स इंडिया या प्रथितयश प्रकाशनाने त्यांना सात वेळा आपल्या टॉप १०० सेलेब्रिटींच्या यादीत स्थान देऊन गौरवलं आहे. तसेच भारत सरकारनेही पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित केलं आहे.

आजही त्या सिनेसृष्टीत कार्यरत आहेतच आणि नृत्यकलेचे धडे गिरवण्यात मदत करत आहेत. आपण त्यांना अनेक डान्स रियालिटी शोज मधून पण बघितलं आहेच. नुकताच त्यांचा बकेट लिस्ट हा मराठी चित्रपट प्रदर्शित होऊन गेला. त्यासाठी त्याचं कौतुक झालं. आणि ते यापुढेही होत राहिल. कारण मराठी मातीचा पताका हिंदी सिने सृष्टीत कायम स्वरूपी डौलाने फडकवणाऱ्या कलाकारांमध्ये त्याचं अढळ असं स्थान आहे.

उर्मिला मातोंडकर :

मराठी मातीची पताका डौलाने फडकत ठेवाणाऱ्या अजून एका अभिनेत्रीचं नाव म्हणजे उर्मिला मातोंडकर. आपल्या अभिनयाबरोबरच स्वतःची अशी खास स्टाईल त्यांनी निर्माण केली. त्या मुळेच हिंदी सिनेसृष्टी मधील सर्वोत्तम शिखरावर त्यांनी स्वतःची छाप सोडली. त्यांनी मराठी आणि हिंदी सोबतच, तेलगु, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये हि कामे केली आहेत. बाल कलाकार म्हणून त्यांनी एका मराठी चित्रपटात काम सुरु केले. पुढे हिंदीत पदार्पण केले ते १९८१ साली. पण त्यांना प्रसिद्धी मिळाली ती ‘मासूम’ या चित्रपटासाठी. आणि ‘रंगीला’ या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवले. प्रत्येक कलाकाराची एखादी कलाकृती सदैव लक्षात राहते. उर्मिलाजींच्या बाबतीत अशी कलाकृती म्हणजे रंगीला म्हणू शकतो.

अमृता सुभाष :

सध्या सोशल मिडिया वर एक जाहिरात फार प्रसिद्ध झाली आहे. व्हॉटसप ने केलेली हि जाहिरात. यात एक आई आपल्या मुलीबरोबर विडीओ कॉल करताना दिसतेय. आई बनलेली अमृता सुभाष हि गुणी मराठी अभिनेत्री यात झळकली आहे. एका आंतरराष्ट्रीय ब्रँड साठी एका मराठी अभिनेत्रीची निवड झालेली बघून अभिमान खूप अभिमान वाटतो. अमृता सुभाष हिने या आधीही मराठी सोबतच अनेक वेळेस हिंदी सृष्टीत काम केलेलं आहेच. अमृताने ‘रामन राघव २.०’, ‘गली बॉय’ सारख्या हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. तिने गीतकार गुलजार यांच्या बरोबरही काम केले आहे. कुसुमाग्रजांच्या मराठी कवितांचा उर्दूत अनुवादही तिने गुलझार साहब यांच्या बरोबर केला आहे. अमृताची आई ज्योती सुभाष यांच्या मुळे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दोघींनी अनेक चित्रपटात एकत्र कामही केले आहे. आज आपल्या भाषा आणि अभिनय प्रभुत्वामुळे अमृता सुभाष हिने आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे.

प्रिया बापट :

मराठी चित्रपटसृष्टीतील टॉपची आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. प्रियाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपल्या अभिनयाची छाप मराठी प्रेक्षकांवर सोडली आहे. तिने वेगेवेगळ्या धाटणीचे चित्रपट करून अभिनयाच्या बाबतीत आपण सरस आहोत हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. मग ‘टाइम्प्लिज’ चित्रपट असो कि ‘वजनदार’ असो कि मग ‘हॅप्पी जर्नी’. प्रियाने लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट ‘मुन्नाभाई एम बीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ ह्या चित्रपटांत काम केलेले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय असणाऱ्या प्रियाला करिअरच्या सुरुवातीच्या काळात बॉलिवूड चित्रपटाच्या ऑफर्स येत होत्या. त्यात मग तिला शाहरुख सोबत ‘चक दे इंडिया’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु शिक्षण बाकी असल्या कारणास्तव तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. प्रियाने गेल्या वर्षी आलेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ह्या वेबसेरीज मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. ह्या वेबसिरीजमधील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.

ह्या सर्व अभिनेत्रींमध्ये सर्वात अगोदर आर्वजून नाव येते ते म्हणजे स्मिता पाटील ह्यांचे. त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर खूप कमी कालावधीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याचबरोबर सई ताम्हणकर हिने ‘हंटर’, ‘गजीनी’ सारख्या चित्रपटांत काम केले आहे. तर सोनाली कुलकर्णी (जुनी अभिनेत्री) हिने ‘दिल चाहता है’, ‘टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह’ सारख्या अनेक हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. तर सोनाली कुलकर्णी (नवीन अभिनेत्री) हि ‘ग्रँड मस्ती’ ह्या चित्रपटात दिसली होती. हिंदी असो वा कोणत्याही भाषेतील सिनेसृष्टी. मराठी अभिनेत्रींनी आपल्या अभिनय, नृत्य, भाषेवरच प्रभुत्व या मुळे मनोरंजन जगत गाजवले आणि गाजवत राहतील. मराठीची पताका फडकवत ठेवणाऱ्या या अभिनेत्रींना मानाचा मुजरा.

 

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *