Breaking News
Home / माहिती / ह्या ७ वर्षाच्या मुलीने अशी कमाल केली, कि शाळेच्या पुस्तकात आले नाव

ह्या ७ वर्षाच्या मुलीने अशी कमाल केली, कि शाळेच्या पुस्तकात आले नाव

लहान मुलं आणि त्याचं विश्व हा नेहमीच आपल्या कौतुकाचा विषय असतो. अशीच एक मुलगी सध्या सगळ्यांच्या कौतुकाचा विषय बनली आहे. आणि तिच्या कौतुकाचं कारण काय आहे हे ऐकून तुम्हाला पण अभिमान वाटेल.

आपल्या सगळ्यांना लहान मुलांचं आणि त्यांच्या कल्पना विश्वाच अप्रूप असतं. त्यांच्या विचारांना आपण अनेक वेळेस हसण्यावारी नेतो. पण काही वेळा हीच मुलं, त्यांच्या प्रश्नांनी आपल्याला विचार करायला भाग पाडतात. ते म्हणजे यांना हे सुचलं आणि जमलं, मग आम्हा मोठ्यांना का नाही? अशीच कामगिरी सध्या “जन्नत’ नावाच्या एका ७ वर्षीय मुलीने केली आहे. वय केवढं, तर अवघं, ७ वर्ष. पण काम काय? तर जम्मू काश्मीर मधील दल सरोवर साफ करण्याचं. ती हे काम आपल्या वडिलांबरोबर एका छोट्या बोटीत बसून करते. आणि हे पण गेले दोन वर्ष चालू आहे. असं ए.एन.आय. हि वृत्तसंस्था आपल्या ट्वीट मध्ये नमूद करते.

विचार करा. एवढीशी ती पोर. पण विचार किती नितळ आणि स्वच्छ बघा. आपल्या आजूबाजूला पर्यावरणाचं आपण काय करून ठेवलय आणि ठेवतोय ते बघतो आहोच. पण त्यातही काही जण, पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. त्यात ह्या लहानग्या मुलीचे सुद्धा नाव सामील झालंय. आपल्याला दल सरोवर आणि एकूणच जम्मू काश्मीर माहिती आहे ते निसर्ग सौंदर्यासाठी. पण तिथल्या कचऱ्याच्या समस्येविषयी क्वचितच माहिती असते. आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन या चिमुकलीने हे काम सुरु केलंय. आणि याची दखल, हैदराबाद येथील एका शाळेने घेतली आहे. या शाळेने जन्नत ची हि अभिमानस्पद कामगिरी आपल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली आहे.

 

जन्नतची मुलाखत घेतल्यावर तिने सांगितले कि, “मला सरोवर स्वच्छ करण्याची प्रेरणा माझ्या वडिलांपासून मिळाली आहे. माझी आज जी काही ओळख आहे ते माझ्या वडिलांमुळे आहे.” तर दुसरीकडे सोशिअल मीडियावर लोकांना ह्या ७ वर्षाच्या मुलीची कल्पना खूप आवडली. ट्वीटर वर एरवी सगळ्यांची टर घेणाऱ्या ट्वीटरमंडळींनी सुद्धा तिचं मनापासून कौतुक केलं. तिची कामगिरी आहेच कौतुकास्पद, पण सोबतच आपण पण या सगळ्या पासून धडा घेतला पाहिजे. पर्यावरण संवर्धनाच महत्व आपल्याला कळतच आहे. आता महत्वाची आहे ती त्या बद्दलची कृती. त्यामुळे आपण तिचं कौतुक करूयाच, पण आपल्या सवयी सुद्धा पर्यावरण पूरक बनवूयात.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *