गेल्या काही वर्षांत स्त्री भूमिका करणारे पुरुष नट आपण सतत रियालिटी शोजमधून पाहत आलेले आहोतच. तसं स्त्री भूमिका पुरुषांनी करणं ही काही आज झालेली गोष्ट नाही, भूतकाळातही अशा भूमिका साकारल्या गेल्या आहेतच. अनेक दिग्गज नटांनी या भूमिका केल्या आणि त्या प्रसिद्धही झाल्या. अगदी जुन्या काळातलं पण लोकप्रिय उदाहरण म्हणजे बालगंधर्व. पण बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री भूमिका या काळाची गरज म्हणून होत्या. कारण त्या काळी नाटकांना स्त्रियांनी हजेरी लावणे हे सुद्धा अप्रूप होते तेथे थेट नाटकांत भूमिका म्हणजे अशक्यच.
पुढील काळात स्त्रियांचा मनोरंजन क्षेत्रात सहभाग वाढला आणि पुरुषांनी स्त्री व्यक्तिरेखा करणं कमी झालं. पण अशा भूमिका जिथे केल्या गेल्या, तिथे सहसा कथेनुसार पुरुष पात्र स्त्री वेश धारण करतं आणि वेळ मारून नेतं किंवा इप्सित साध्य करतं असं कथानक असल्यामुळे. अशाच आशयाचा एक सिनेमा आहे जो महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नेहमीच आनंदी करतो. त्याचं नाव आहे ‘अशी हि बनवाबनवी’. या सिनेमाने नुकतीच ३२ वर्षे पूर्ण केली. या लोकप्रिय सिनेमाच्या वाटचालीनिमित्ताने स्त्री भूमिका करणाऱ्या मराठी कलाकारांचा घेतलेला आढावा.
सचिन पिळगावकर
अशी हि बनवाबनवी या सिनेमामधील सुधा हि व्यक्तिरेखा सचिन पिळगावकर यांनी वठवली होती. त्या कथेची गरज म्हणून हे वेषांतर त्यांना करावं लागलं होतं. मुख्य भूमिका सुधीर या नावाची होती जी धनंजय माने यांचा एक गायक मित्र असतो. पुढे घर बदलायचं म्हणून याच सुधीरची सुधा होते. पुढे तर सिद्धार्थ रे यांच्या व्यक्तिरेखेच्या म्हणजे शंतनूच्या प्रेम प्रकरणापाई सुधाला दुर्धर आ जार असल्याचीही बतावणी केली जाते. असे एक ना अनेक किस्से त्या सिनेमात दाखवले गेले होते. एकूणच भन्नाट संकल्पनेवर आधारित त्या सिनेमातील व्यक्तिरेखाही तेवढ्याच भन्नाट लिहिलेल्या आणि अभिनित केलेल्या होत्या. सचिनजींनी त्या भूमिकेतून दाखवलेले स्त्री सुलभ हातवारे, चेहऱ्यावरचे हावभाव यांच्यामुळे ते या भूमिकेत अगदी चपखल बसले होते.
सुबोध भावे
सुबोध भावे यांनी अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा ताकदीने उभ्या केल्या. या व्यक्तिरेखांची मानसिकता, त्यांचा प्रवास, त्यातील उतार चढाव त्यांनी आपल्या समर्थ अभिनयाने जिवंत केले. त्यांनी नारायण श्रीपाद राजहंस तथा, बालगंधर्व यांची व्यक्तिरेखा चितारताना तर आपली सगळी ताकद पणाला लावली. यात बालगंधर्व एक व्यक्ती आणि एक कलाकार म्हणून दाखवायचे होते. त्यामुळे बालगंधर्व यांनी केलेल्या स्त्री भूमिका करताना त्यांनाही स्त्रीवेश करून भूमिका साकारावी लागली.
प्रसाद ओक
प्रसाद ओक यांना आपण अभिनेता, दिग्दर्शक, गायक म्हणून ओळखतो. त्यांनी अनेक नाटकं, सिनेमे आणि मालिकांमधून आपलं मनोरंजन केलेलं आहे. सारेगमप या मराठी रियालिटी शोचे ते विजेतेही होते. तर अशा या अष्टपैलू कलाकाराने ‘नांदी’ या नाटकात स्त्री भूमिका साकारली होती. हृषीकेश जोशी दिग्दर्शित या नाटकाचे अनेक प्रयोग झाले. स्त्री पुरुष संबंध कालानुरूप कसे बदलत गेले आहेत हे या नाटकातून दाखवले गेलेले आहे. यातील, प्रसाद ओक यांच्या भूमिकेचे नाव रुक्मिणी असे होते आणि त्यांच्या इतर भूमिकांप्रमाणेच त्यांची या भूमिकेसाठीही प्रशंसा झाली होती.
लक्ष्मीकांत बेर्डे
अशी हि बनवाबनवीचा विषय निघावा आणि लक्ष्मीकांतजी यांची आठवण होणार नाही, असं होऊच शकत नाही. या सिनेमातील परश्या या व्यक्तिरेखेचे पार्वती या व्यक्तिरेखेत रुपांतर करावे लागते पण मूळ सवयी काही पटकन बदलत नाहीत, त्यामुळे घडणारे विनोद आजही हसवून सोडतात. मग ते विड्या ओढतानाचा प्रसंग असो वा कमळी या आपल्या प्रेयसीला भेटायला जायचा प्रसंग. परशुराम या व्यक्तिरेखेची हतबलता अगदी हसवून सोडते. त्यात लक्ष्मीकांतजी यांच्या चटपटीत संवादांनी त्यात एक खुसखुशीतपणा आणला आहे, ज्यामुळे आजही ते प्रसंग तेवढेच ताजेतवाने वाटतात.
विजय चव्हाण आणि भरत जाधव
विनोदी भूमिका अजरामर करणाऱ्या या दोन्ही कलाकरांची नावे एकत्र घेण्याचे कारण म्हणजे त्यांनी केलेली एक भूमिका. ती म्हणजे मोरूची मावशी. विजय चव्हाण यांनी हि भूमिका अजरामर केली. यातील ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणं आणि त्यावरचा विजय चव्हाण यांचं नृत्यही गाजलं. प्रत्येक कलाकारासाठी एक कलाकृती अशी असते, जी त्याची आयुष्यभरासाठी ओळख बनून जाते. विजय चव्हाण यांच्या बाबतीत हि अशीच भूमिका ठरली. सुधीर भट यांच्या नाट्य संस्थेचे हे पहिले नाटक. पुढे या नाटकाचं पुनरुज्जीवन केलं गेलं तेव्हा भरत जाधव यांची निवड केली गेली होती. महत्वाची गोष्ट अशी कि, खुद्द विजय चव्हाण यांनी भरत जाधव यांना या भूमिकेसाठी मार्गदर्शन केलं होतं. आजही भरतजी मुलाखतीच्या वेळी या भूमिकेविषयी आणि विजय चव्हाण यांच्या विषयी बोलताना भावूक होतात. तसेच, पुढील पिढ्यांपर्यंत अशा अजरामर नाटकांतील अजरामर भूमिका पोहोचायला हव्यात असंही ते नमूद करतात.
दिलीप प्रभावळकर आणि पुष्कर श्रोत्री
दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या लेखणीतून आणि अभिनयातून अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखा समर्थपणे साकारल्या. यात बोक्या सातबंडे हि त्यांच्या लेखणीतून आलेली प्रसिद्ध व्यक्तिरेखा. तर, मराठी नाटकांतील चिमणराव, टेलीविजन वर गंगाधर टिपरे, सिनेमात महात्मा गांधी आणि अशा कित्येक व्यक्तिरेखा त्यांनी अभिनेता म्हणून साकारल्या. तसेच त्यांनी केलेल्या स्त्री भूमिकाही गाजल्या. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे हसवा फसवी या नाटकातील. दीप्ती हि भूमिका निभावली होती. सदर व्यक्तिरेखा काल्पनिक होती पण दिलीप प्रभावळकर यांची लहानपणी हरवलेली बहिण असल्याचे त्या नाटकांत भासवले गेले होते. या विनोदी नाटकांत त्यांनी अजून पाच वेगवेगळ्या भूमिका निभावल्या होत्या. पुढे पुष्कर श्रोत्री यांनीही हसवा फसवी हे नाटक केलं तेव्हा त्यातही स्त्री भूमिका केली होती तसेच इतर भूमिकाही निभावल्या होत्या.
दिलीप प्रभावळकर यांची अजून एक प्रसिद्ध भूमिका म्हणजे वासूची सासू या प्रसिद्ध नाटकातही स्त्री भूमिका. पुढे या नाटकाचे पुनरुजीवन करताना प्रणव रावराणे याने हि भूमिका केली होती. या नाटकाच्या नवीन प्रयोगांचे दिग्दर्शन, मंगेश कदम यांनी केले होते. पण हि व्यावसायिक नाटके झाली. त्यांनी बाल रंगभूमीवरून “अलबत्या गलबत्या” नाटकांतून केलेली चेटकिणीची भूमिकाही गाजली होती. पुढे हीच भूमिका प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी साकारली होती.
वैभव मांगले
वर उल्लेख केल्या प्रमाणे वैभव यांनी ‘अलबत्या गलबत्या’ नाटकांतून चेटकिणीची भूमिका पुनरुज्जीवित केली होती. प्रेक्षकांनी हि तिचं अमाप कौतुक केलं. वैभव यांना या व्यतिरिक्त आपण अनेक नाटकं, सिनेमे, मालिका यांच्या मधील कामासाठी ओळखतो. तसेच ते उत्तम गातातही आणि उत्तम चित्रकारही आहेत.
तर अशा या हरहुन्नरी कलाकाराने काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतही स्त्री भूमिका वठवली होती. या मालिकेचं दिग्दर्शन आणि निर्मिती, मंदार देवस्थळी यांनी केली होती. या मालिकेची कथा एका कलाकाराभोवती फिरते. असा कलाकार जो कुशल नट असला तरीही रूढार्थाने त्याच्या दिसण्यामुळे त्याची मुख्य भूमिकेसाठी निवड होत नसते. आर्थिक परिस्थिती नाजूक म्हणून त्याची पत्नी व्यस्त आयुष्यातून वेळ काढून स्वतः एक छोटा व्यवसाय चालवायला बघते. तिची होत असलेली तगमग आणि तळमळ पाहून मग स्त्री भूमिका करायचा निर्णय हि व्यक्तिरेखा म्हणजे वैभव मालवणकर घेते. पुढे मग कशी धमाल उडते हा मालिकेचा विषय. मालिकेचा शेवट मात्र एक उत्तम संदेश देऊन, कलाकारांची व्यथा मांडून झाला आहे. वैभव यांनी इतर भूमिकांप्रमाणेच या भूमिकेतही अभिनयाचे उत्तम रंग भरले आहेत.
(Author : Vighnesh Khale)