मित्रांनो तुम्हांला २००५ साली आलेली नवनीतत पाठ्यपुस्तकांची जाहीरात तर आठवत असेलच. ‘नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो’ हे ह्या जाहिरातीचे झिंगल होते. ह्या जाहिरातीत अनेक बालकलाकारांनी काम केले होते. त्यातीलच एक बालकलाकार आता मराठी अभिनेत्री झाली आहे. त्या अभिनेत्रीने मराठी मालिका, चित्रपटांत काम केलेले आहे. नुकतीच तिची मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. हे वर्ष सरत आलं असताना काही मालिका या प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यातील एक नवीन मालिका म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका.
या मालिकेतील दोन अभिनेत्री या नवीन मालिकेच्या प्रोमोज मधून आपल्याला दिसत आहेत. यातील एक आहेत शुभांगी गोखले आणि दुसरी आहे अन्वीता फलटणकर. शुभांगीजी यात सासूबाईंच्या भूमिकेत आहेत तर अन्वीता ही सूनबाईंच्या भूमिकेत. प्रोमोज मधून दोघींची खट्याळ केमिस्ट्री उत्तम जमून आल्याचं दिसतं आहे. आज या सासू सुनेच्या जोडीपैकी सुनेची भूमिका साकारणाऱ्या अन्वीता विषयी आपण जाणून घेणार आहोत, जिने १५ वर्षांपूर्वी नवनीतच्या जाहिरातीतसुद्धा काम केले होते. अन्वीता ही मुळची ठाण्याची. बालपण, शालेय शिक्षण ठाण्यात झालं. घरी कालाक्षेत्राची आवड होतीच आणि प्रोत्साहनही होतं. एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अन्वीता हिने सांगितल्या प्रमाणे तिला अभिनय आणि नृत्याची आवड होतीच. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमातून ती सातत्याने भाग घेत असे. तिच्या अनेक सोशल मीडिया पोस्ट्स मधून हे दिसून येतं. तिच्या आई वडिलांनी तिला कला शिबिरांना पाठवून ही आवड जोपासली आणि वाढवली. तसेच या काळात तिने काहीसं कामही केलं होतं. ‘नवनीत’ या प्रसिद्ध नामामुद्रेसाठी तिने जाहिरातीत अभिनय केला होता. एकूणच काय तर, गाठीशी अभिनयाचा थोडाफार अनुभव आला होता.
त्यामुळे रुपारेल कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला तोपर्यंत अभिनय करण्यासाठी जी भीड चेपण महत्वाचं असतं ते झालं होतं. याचाच फायदा तिला ऑडिशन्सच्या वेळी झाला असावा. याच काळात तिचा पहिला चित्रपट तिने केला. ‘टाईमपास’ हा तिचा पहिला चित्रपट. या चित्रपटातील चंदा ही तिची व्यक्तिरेखा अतिशय गाजली. चंदा सारखी एक तरी मैत्रीण आपल्याला असतेच असं प्रत्येकाला मनातल्या मनात वाटून गेलं, इतकी ती व्यक्तिरेखा खरीखुरी वाटली. पुढे तिने ललित कालाकेंद्रात प्रवेश केला. मूलतः असणारी अभिनयाची आवड आणि त्यात ललित कला केंद्रात प्रवेश यांच्यामुळे तिच्यातील अभिनेत्रीला पैलू पडले, असं आपण म्हणू शकतो. तिने तिथे असंख्य एकांकिका आणि नाटकांतून अभिनय केला. पुढे व्यावसायिक नाटकातूनही तिने अभिनय केला. ‘व्हाय सो गंभीर’ हे तिचं गाजलेलं व्यावसायिक नाटक. तसेच ‘गर्ल्स’ हा तिचा अजून एक चित्रपटही खूप गाजला. मनमिळाऊ, प्रेमळ अशी रुमी तिने अगदी खुबीने साकार केली. नाटक, चित्रपट यांतून अभिनय करत असताना तिने वेब सिरीज या नवं माध्यमातूनही अभिनय साकार केला तो ‘यु टर्न’ या वेब सिरीजमधून. तसेच ती ‘बकासुर’ नावाच्या युट्यूब चॅनेल मार्फत आपल्या भेटिस येत असतेच.
एवढ्या विविध माध्यमांतून अभिनय करत असताना तिने टीव्हीच्या पडद्यावर सुद्धा काम करणं सुरू केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय मालिकेत सुरुवातीचा काही काळ तिने प्रहसनांतून अभिनय केला. यात मंदार मांडवकर हा तिचा सहकलाकार असे. या दोघांच्या जोडीने केलेल्या अनेक प्रहसनांनी प्रेक्षक, सहकलाकार यांना अगदी खळखळून हसवलं होतं. आता अन्वीता ही पुन्हा ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून आपल्या समोर येते आहे. सध्या या मालिकेचे प्रोमोज प्रेक्षक, समीक्षक यांच्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. तिच्या अन्य कलाकृतींप्रमाणे ती या कलाकृतीतही स्वतःची छाप सोडेल आणि लोकप्रियतेचं अजून एक शिखर गाठेल, हे नक्की. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून अन्वीता हिला मनःपूर्वक शुभेच्छा !