Breaking News
Home / मराठी तडका / २०२० मध्ये ह्या लोकप्रिय मालिकांनी घेतला निरोप, नंबर ७ वर असलेली मालिका अडीच वर्षे गाजली

२०२० मध्ये ह्या लोकप्रिय मालिकांनी घेतला निरोप, नंबर ७ वर असलेली मालिका अडीच वर्षे गाजली

२०२० ह्या वर्षी अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. त्यातील अनके मालिका अल्पावधीतच लोकप्रिय देखील झाल्या. तर काही मालिकांनी सरत्या वर्षात प्रेक्षकांचा निरोप देखील घेतला. त्यातील अनेक मालिका ह्या लोकप्रिय झाल्या होत्या. काही गाजलेल्या मालिकांचे कथानक संपल्यामुळे बंद कराव्या लागल्या, काही मालिकांचा टीआरपी कमी झाल्यामुळे कमी कालावधीत बंद देखील कराव्या लागल्या. आज आपल्या लेखात आपण अश्याच मालिका पाहणार आहोत, ज्यांनी ह्यावर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

१. मिर्सेस मुख्यमंत्री :
२४ जून २०१९ ह्या दिवशी सुरु झालेली हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. मालिकेतील सुमी आणि समरची जोडी प्रेक्षकांनी खूप आवडली. ह्यात अभिनेत्री अमृता धोंगडे हिने मुख्यमंत्र्यांची बायको सुमी हिची भूमिका साकारली होती. ‘मी मिरवणार, सगळ्यांचीच जिरवणार’ हा तिचा डायलॉग खूप लोकप्रिय ठरला होता. तर समर म्हणजेच मुख्यमंत्री समरसिंह पाटील ह्याची भूमिका अभिनेता तेजस बर्वे ह्याने साकारली होती. ह्या मालिकेत खानावळ चालवणारी सुमी ते मिर्सेस मुख्यमंत्री पर्यंतचा तिचा प्रवास दाखवण्यात आला होता. सुमी आणि समर सोबतच बबन, समरचे मामा हि पात्रे देखील लोकप्रिय झाली होती.

२. डॉ बाबासाहेब आंबेडकर :
१९ एप्रिल २०१९ ह्या दिवशी प्रसारित झालेली हि मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. हि मालिका महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवनावर आधारित होती. मालिकेत अभिनेता सागर देशमुख ह्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली होती. सागर देशमुख ह्यांनी निभावलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. सागर देशमुख ह्यांनी ह्याअगोदर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे ह्यांच्या जीवनावर आधारित ‘भाई’ चित्रपटात पु.ल. देशपांडे ह्यांची भूमिका साकारली होती. तर डॉ. आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई ह्यांची भूमिका शिवानी रंगोले, आई भीमाबाई ह्यांची भूमिका चिन्मयी सुमित, तर मीरा आत्याची भूमिका पूजा नायक ह्यांनी साकारली होती.

३. अग्निहोत्र २ :
२००९ साली आलेली ‘अग्निहोत्र’ ह्या मालिकेला खूपच लोकप्रियता मिळाली होती. ह्या मालिकेत विक्रम गोखले, शरद पोंक्षे, मोहन जोशी, शुभांगी गोखले, मुक्ता बर्वे, सिद्धार्थ चांदेकर, गिरीश ओक, विनय आपटे ह्यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले होते. साधारणतः १० वर्षांपूर्वी आलेल्या ह्या सुपरहिट मालिकेची लोकप्रियता कॅच करून घेण्यासाठी वाहिनीने २०१९ साली ह्या मालिकेची दुसरी सिरीज ‘अग्निहोत्र २’ सुरु केली. २ डिसेम्बरपासून ह्या मालिकेला सुरुवात झाली. ह्या मालिकेत शरद पोंक्षे, रश्मी अनपट, राजन भिसे, बाप्पा जोशी ह्यासारखे कसलेले कलाकार ह्या मालिकेत होते. परंतु अवघ्या ३ महिन्यातच हि मालिका बंद करण्याचा चॅनेलने निर्णय घेतला.

४. वैजू नं १ :
‘अग्निहोत्र २’ हि मालिका बंद होताच त्या जागी चॅनलने ‘वैजू नं १’ हि मालिका आणली. ह्या मालिकेचा पहिला भाग ९ मार्च २०२० ला प्रसारित झाला होता. अभिनेत्री सोनाली पाटील हिने वैजू नावाची भूमिका साकारली होती. तर वैजूचा नवरा हवालदार सुशील शिर्केची भूमिका अभिनेता समीर खांडेकर ह्याने साकारली होती. ह्या मालिकेत २२ कुटुंबांची ‘तिसरी मंजिल’ नावाच्या चाळीवर हि मालिका दाखवली होती. चाळीत अनेक प्रकारची लोकं राहत असल्यामुळे चाळीत घडणाऱ्या वेवेगळ्या गमतीजमती ह्या मालिकेत दाखवण्यात आल्या. ह्याच महिन्यात ५ डिसेंबर २०२० रोजी ह्या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला होता.

५. लग्नाची वाईफ वेडींगची बायको :
हि मालिका २१ ऑक्टोबर २०१९ रोजी झी मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात आली. लवकरच हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ह्या मालिकेत अगोदरच विवाहित असलेला मदन विदेशातुन विदेशी असलेल्या मारियाला लग्नाचे वचन देऊन भारतात आणतो. त्यामुळे त्याच्यासमोर काय काय परिस्थिती उध्दभवते हे ह्या मालिकेत दाखवण्यात आले. ह्या मालिकेत मदनची भूमिका अभिनेता विजय आंदळकर, मारियाची भूमिका लीना आनंद, काजोलची भूमिका रुपाली झंकार हिने साकारली होती.

६. रात्रीस खेळ चाले २ :
२०१६ साली आलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ ह्या थरारक मालिकेने एक वेगळीच लोकप्रियता मिळवली होती. पहिल्या सिजनच्या यशानंतर मालिकेने दुसरा सीजन १५ जानेवारी २०१९ रोजी प्रसारीत केला. ह्या सिजनला सुद्धा अपेक्षेपेक्षा खूप जास्त लोकप्रियता मिळाली. मालिकेतील अण्णा-शेवंता ह्या जोडीला तर प्रेक्षकांनी अगदी उचलून घेतले. सोशिअल मीडियावर ह्या जोडीवर अनेक प्रकाराचे मिम्स, लेख, स्टेट्स बनवले गेले. मालिकेत अण्णा नाईकची भूमिका अभिनेते माधव अभ्यंकर तर शेवंताची भूमिका अपूर्वा नेमळेकर हिने साकारली होती. मालिकेतील अण्णा शेवंता जोडीसोबतच पाटणकर, इंदू, चोंट्या, पांडू, दत्ता, नेने वकील, गुरव, छाया, वच्छे, शोभा हि पात्रे देखील खूप लोकप्रिय झाली. २० ऑगस्ट २०२० रोजी ह्या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला होता. जरी ह्या मालिकेने निरोप घेतला असला तरी मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता अजूनही तशीच आहे.

७. स्वराज्यरक्षक संभाजी :
झी मराठी वाहिनीवर २४ सप्टेंबर २०१७ रोजी पहिला भाग प्रसारित झालेल्या ह्या मालिकेने जवळजवळ अडीच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सध्याच्या काळात ह्या मालिकेने मालिकाविश्वात सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवली. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजीराजे भोसले ह्यांच्या जीवनावर हि मालिका आधारित होती. २९ फेब्रुवारी २०२० रोजी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. मालिकेत डॉ. अमोल कोल्हे ह्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. डॉ. अमोल कोल्हे ह्यांनी २००८ साली आलेल्या छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाली होती. हि मालिका सुद्धा सुपरहिट ठरली होती. ह्या दोन्ही मालिकेत डॉ. अमोल कोल्हे ह्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. ह्या २१ डिसेंबर २०२० पासून ‘स्वराज्यजननी जिजामाता – नवे पर्व’ हि मालिका प्रसारित होत असून, मालिकेत डॉ. अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ह्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री नीना कुलकर्णी आई जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत.

त्याचसोबत मोलकरीण बाई, हे मन बावरे, विठू माउली, प्रेमाचा गेम सेम तू सेम, टोटल हुबलाक, एक गाव भु ताचा ह्या मालिकांनी देखील सरत्या वर्षात प्रेक्षकांचा निरोप घेतला. ह्या सर्व मालिकांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आणि प्रेक्षकांनीही ह्या मालिकांना खूप प्रेम दिले. तर ह्या होत्या २०२० साली प्रेक्षकांच्या निरोप घेतलेल्या मालिका. तर मित्रांनो ह्यापैकी तुमची आवडती मालिका कोणती होती, हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हांला ह्यापैकी कोणत्या मालिकेचा पुढचा सीजन पाहायला आवडेल, हे हि नक्की कळवा. मित्रांनो, आपल्या मराठी गप्पाला वेळोवेळी मिळत असेलेल्या तुमच्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही असंच प्रेम देत राहा. आम्ही ह्यापुढेही असेच नवीन नवीन विषय घेऊन तुमच्यापर्यंत येत राहू.

(Author : Rahul Ranjan Arekar)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *