बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला आज कोण ओळखत नाही? आजच्या अक्षय कुमारचा परिस्थितीमुळेच सामान्य चाहत्यांना असे वाटते की बॉलीवूडच्या प्रत्येक अभिनेत्याची लाईफस्टाईल अशीच आलिशान असते, अर्थात त्याला कारणही तसेच आहे कारण त्यांच्याकडे असलेल्या महागड्या गाड्या, अलिशान बंगले, उंची वस्त्रे इत्यादी. परंतु लोकांना फक्त वरवरचं दिसतं त्या व्यक्तीचा संघर्ष दिसत नाही. चला तर मग जाणून घेऊया याच संघर्षाची गोष्ट. हरिवंश राय बच्चन यांच्या ‘कोशिश करने वालों की कभी हार नही होती’ काव्यपंक्ती अक्षय कुमारला पुरेपूर लागू होतात. अक्षयला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्याने आपला स्वतःचा विश्वास कमी होऊ दिला नाही. दिवस-रात्र त्याने आपले ध्येय गाठण्यासाठी कष्ट घेतले आहेत.
युवा पिढीतील प्रत्येकाला अक्षय कुमारचा आयुष्यभराचा हा प्रवास प्रेरणा देणारा आहे. जर कोणी आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम घेत असेल तर त्याला यश फार काळ हुलकावणी देत नाही. अक्षय कुमारचे जीवन सर्वसामान्याप्रमाणेच होते. पण त्याने त्याच्या जीवनात घेतलेल्या महत्त्वपुर्ण आणि ठोस निर्णयामुळे आज तो यशाच्या शिखरावर आहे. सुरुवातीपासूनच अक्षय कुमारचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता. इतकंच नाही तर अक्षय कुमारने मिळालेल्या यशानंतर देखील आयुष्यात कधीच गर्व दाखवला नाही. बॉलिवूड मधील वादविवादापासुन दूर राहण्याचाच त्याचाच प्रयत्न असतो. याबद्दल आपणास ठाऊक आहेच की त्याला संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खिलाडी या नावाने ओळखले जाते.
अक्षयकुमारचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला असून दिल्लीच्या चांदनी चौकात बालपण घालवल्यानंतर अक्षय मुंबईला आला आणि डॉन बॉस्को शाळेत शिकला. नंतर त्याने गुरुनानक खालसा कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले. त्याने अगदी सुरुवातीच्या काळात चांदनी चौकात आचाऱ्याचं काम सुध्दा केले आहे. फार कमी लोकांना अक्षय कुमार चे खरं नाव माहिती आहे. तर ‘राजीव हरी ओम भाटिया’ हे अक्षय कुमारचे मूळ नाव आहे. दिल्लीहुन मुंबईला जाऊन हिऱ्याचे दागिने विकण्याचे कामही अक्षयने केले आहे. या सर्व कामांमधुन अक्षय स्वतःचा खर्च भागवत असे. अक्षय कुमारचे वडील एका संस्थेचत अकाऊंटट म्हणून काम करत. अभ्यासात हुशार नसल्यामुळे अक्षयला त्याच्या वडिलांनी बँकॉकला पाठवले. तिथे तो जवळपास पाच वर्षे मार्शल आर्टस् शिकला. मुंबईला परत आल्यावर त्याने लहान मुलांना मार्शल आर्टस्चे धडे देण्यास सुरुवात केली. मुंबईमध्ये अक्षयने काही काळासाठी हॉटेल मध्ये वेटरची नोकरीसुद्धा केली होती. परंतु त्याने हे काम जास्त दिवस केले नाही. त्यांनतर त्याने कोलकाताच्या एका ट्रॅव्हलिंग एजन्सी मध्ये सुद्धा काम केले. अक्षय कुमारने बांग्लादेशात सुद्धा काम केले आहे, हे खूपच कमी जणांना माहिती आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांचे अनुभव घेतल्यानंतर त्याने एका फोटोग्राफरकडे लाईट बॉयचे सुध्दा काम केले आहे. कामाप्रतीची आवड, जिद्द, मेहनत पाहून फोटोग्राफरने त्याचा फ्री मध्ये पोर्टफोलिओ बनवून दिला. त्यानंतर तो पोर्टफोलिओ घेऊन सिनेमात काम मिळवण्यासाठी अक्षय विविध सिनेदिग्दर्शकांकडेच गेला. मॉडेलिंगमध्ये लवकरच अक्षयला संधी मिळाली. मॉडेलिंगसाठी त्याने दोन दिवस शूटिंग केली आणि त्याला इतके पैसे मिळाले जितके तो महिनाभर मार्शल आर्टस् शिकवून कमवायचा. हेच कारण पुरेसं होतं, अक्षयने निर्णय घेतला कि मॉडेलिंग आणि चित्रपट लाईन खूप चांगली आहे. तो मॉडेलिंग सोबत चित्रपट निर्मात्यांच्या ऑफिसच्या सुद्धा फेऱ्या मारू लागला. एकदा त्याला बँगलोरला एका ऍडव्हर्टिसिमेंट साठी जायचे होते आणि अक्षयने फ्लाईट मिस केली. त्या रिकामी वेळेचा उपयोग करण्यासाठी मग तो एका चित्रपट निर्मात्याच्या ऑफिसमध्ये काम मागायला गेला आणि त्याला संध्याकाळीच प्रमोद चक्रवर्तीच्या चित्रपट ‘दिदार’ मध्ये हिरोची भूमिका मिळाली.
अक्षय कुमारने महेश भट्टच्या १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘आज’ चित्रपटात एका मार्शल आर्टस् प्रशिक्षकाची भूमिका केली होते जी फक्त ७ सेकंदाची होती. अक्षय कुमारला जेव्हा माहिती पडलं कि राजेश खन्ना ‘जय शिव शंकर’ नावाचा चित्रपट बनवत आहे आणि त्यांना एका नवोदित अभिनेत्याची गरज आहे तर तो त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन पोहोचला. दोन तीन तास त्याने वाट पहिली, परंतु राजेश खन्ना त्याला न भेटताच निघून गेले. अक्षय कुमार सांगतो कि त्याने त्या दिवशी स्वप्नातसुद्धा हा विचार केला नव्हता कि तो एकेदिवशी राजेश खन्नाच्या मुलीसोबत लग्न करेल. हिरो म्हणून १९९१ मध्ये रिलीज होणारा ‘सौगंध’ हा अक्षय कुमारचा सर्वात पहिला चित्रपट होता. अक्षय कुमारचे पाय जेव्हा बॉलिवूडमध्ये जम पकडू लागले तेव्हा त्याला धडाधड चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या. तेव्हा त्याने अनेक चित्रपट साइन केले. खिलाडी चित्रपटाने अक्षयला स्टारडम दिले. त्यानंतर त्याने पुन्हा कधीच मागे वळून पहिले नाही. १९९४ मध्ये तर हि परिस्थिती होती कि अक्षय कुमारचे चार पाच नाही तर तब्बल ११ चित्रपट रिलीज झाले होते. अक्षयला वेगाने काम करायला आवडते. हेच कारण आहे कि अजूनही त्याचे वर्षात तीन किंवा चार चित्रपट रिलीज होत असतात.