Breaking News
Home / बॉलीवुड / एका फोनवर गोविंदाने सलमानचे करिअर वाचवण्यासाठी स्वतःचा चालू असलेला चित्रपट सोडला होता

एका फोनवर गोविंदाने सलमानचे करिअर वाचवण्यासाठी स्वतःचा चालू असलेला चित्रपट सोडला होता

सलमान खान बॉलिवूडचा असा एकमेव सुपरस्टार आहे जो इतका मोठा स्टार असूनही कोण्या सामान्य माणसाला उचलतो आणि त्याला स्टार बनवतो. खरं तर बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त नवोदित कलाकार सलमान खाननेच लाँच केले आहेत. सोनाक्षी सिन्हा, कतरीना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, डेझी शाह ह्यासारख्या अनेक कलाकारांना सलमान खाननेच लाँच केले. ह्याशिवाय त्याने आपले भाऊ सोहेल आणि अरबाज ह्यांचे करियर सुद्धा खूप सावरले आहे. परंतु तुम्हांला हे जाणून आश्चर्य वाटेल कि सलमान खान जो इतका मोठा सुपरस्टार आहे, त्याने करियरमध्ये अशी सुद्धा वेळी पाहिली आहे ज्यावेळी त्याच्याजवळ चित्रपट नव्हते, आणि जे चित्रपट मिळाले होते ते फ्लॉप होत होते. तेव्हा सलमान खानला एका स्टार कडून मदत मागावी लागली. तो स्टार सुद्धा सलमान सारखा मनाने खूप चांगला आहे. तो अभिनेता म्हणजे गोविंदा. तर आजच्या लेखात केव्हा सलमानने गोविंदाकडे मदत मागितली, का सलमानला गोविंदाकडून मदत मागावी लागली आणि मग पुढे जाऊन कसे सलमानने गोविंदाचे हे उपकार फेडले.

यात काही शंका नाही कि सलमान खानची बॉलिवूडमध्ये एंट्री धमाकेदार होती. मुख्य अभिनेता म्हणून त्याचा पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’ सुपर डुपर हिट ठरला होता. ह्यानंतर ‘साजन’, ‘हम आपके है कौन’, ‘करन अर्जुन’ सारख्या हिट चित्रपटात सलमान खानने काम केले होते. परंतु ह्यानंतर सलमान खानच्या करिअर मध्ये एक असा टप्पा आले जेव्हा त्याचे चित्रपट एकामागून एक फ्लॉप होऊ लागले. हे चित्रपट होते ‘वीरगती’, ‘मजधार’, ‘दुश्मन दुनिया का’ आणि ‘खामोशी’. ह्याच दरम्यान ‘जीत’ चित्रपट सुद्धा आला होता. परंतु ह्या चित्रपटात सलमान खान साईड हिरो तर सनी देओल मुख्य भूमिकेत असल्यामुळे. ‘जीत’ चित्रपटाचे संपूर्ण क्रेडिट सनी देओलला मिळाले. हीच ती वेळ होती जेव्हा सलमान खानला एका चांगल्या चित्रपटाची गरज होती आणि कोणाच्या सपोर्टची. जेव्हा सलमानने ह्याबाबतीत विचार केला तेव्हा त्याच्या डोक्यात सर्वात पहिले नाव गोविंदाचेच आले. त्याला माहिती होते कि गोविंदाच संपूर्ण इंडस्ट्रीत असा व्यक्ती आहे ज्याचे मन मोठं आहे आणि तो सर्वांची मदत करतो. खरं तर सलमान खान आणि गोविंदाने एकत्र कधी कोणत्या चित्रपटात काम केले नव्हते. फक्त ‘अंदाज अपना अपना’ मध्ये गोविंदाची एक पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. परंतु खऱ्या आयुष्यात सलमान, गोविंदा आणि संजय दत्त हे खूपच चांगले मित्र होते.

हि त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा गोविंदा एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता आणि हा चित्रपट होता ‘जुडवा’. होय, हे खरं आहे, जुडवा चित्रपटाचा मुख्य स्टार गोविंदा होता. दिग्दर्शक डेव्हिड धवन हा चित्रपट गोविंदाला घेऊन बनवत होता. इतकंच काय तर ह्या चित्रपटाची शूटिंग सुद्धा सुरु झाली होती. डेव्हिड धवन आणि गोविंदा हि दिग्दर्शक-अभिनेता जोडी त्याकाळची एक नंबरची लोकप्रिय जोडी होती. म्हणून संपूर्ण इंडस्ट्री मध्ये त्याकाळी खूप चर्चा होती कि डेव्हिड धवन गोविंदाला घेऊन ‘जुडवा’ नावाचा चित्रपट करत आहे. हि गोष्ट सलमानच्या सुद्धा कानी आली. तेव्हा सलमानला माहिती झाले गोविंदा आणि डेव्हिड धवन अश्या प्रकारच्या चित्रपटात काम करत आहेत आणि सलमानला ह्याचीच गरज होती. ती म्हणजे एक चांगला चित्रपट आणि एक चांगला दिग्दर्शक. गोविंदा सलमान खानचा चांगला मित्र होता आणि गोविंदाचे मन खूप मोठे होते, ह्यामुळे सलमानने गोविंदाला फोन केला. फोन केल्या केल्या सलमानने गोविंदाला म्हटले, “चीची (गोविंदाचे इंडस्ट्रीमधले टोपणनाव) भैया, अजून किती हिट चित्रपट देणार.” त्यानंतर सलमानने आपल्या मनातली गोष्ट गोविंदाशी शेअर केली आणि त्याला रिक्वेस्ट केली कि, “तुम्ही ज्या चित्रपटात काम करत आहात तो चित्रपट तुम्ही करू नका. तो चित्रपट मला द्या. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक सुद्धा मला द्या. कारण माझे करियर आता चांगले चालू नाही आहे. आणि मला एका चांगल्या चित्रपटाची खूप गरज आहे.”

मग काय होतं सलमानचं बोलणं संपतं न संपतं, इथे गोविंदाने जुडवा चित्रपट सोडला होता. ज्या चित्रपटासाठी गोविंदाने अगोदरच शूटिंग केली होती त्या चालू असलेल्या चित्रपटाला गोविंदाने सलमानसाठी सोडले. तर अश्याप्रकारे हा ‘जुडवा’ चित्रपट सलमानला दिला गेला. हा चित्रपट बनल्यानंतर जेव्हा रिलीज झाला तेव्हा सुपरडुपर हिट ठरला. फक्त चित्रपटच नाही तर ह्या चित्रपटाची गाणी सुद्धा सुपरडुपर हिट झाली. हा पहिला चित्रपट होता जेव्हा सलमानच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले होते. हाच तो चित्रपट होता ज्याने सिद्ध केले कि सलमान फक्त रोमँटिक अभिनेता नाहीए तर कॉमेडी सुद्धा करू शकतो. जरी ह्याअगोदर सलमानने ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटात कॉमेडी केली होती. परंतु तेव्हा हा चित्रपट खूप वाईटरित्या फ्लॉप झाला होता. ‘जुडवा’च असा चित्रपट होता ज्यामुळे सलमानसाठी चित्रपटाची संख्या वाढू लागली. त्याला रोमँटिक चित्रपटांसोबत आता कॉमेडी चित्रपटही येऊ लागले. इतकंच नाही तर जुडवा चित्रपटानंतर डेव्हिड धवन आणि सलमान खान ह्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली आणि नंतर ह्या दोघांनी मिळून अनेक चित्रपट केले. जसे कि ‘बीवी नंबर वन’, ‘दुल्हन हम ले जायेंगे’, ‘चल मेरे भाई’,  ‘मुझसे शादी करोगी’ ह्यासारखे चित्रपट केले.

नंतर आले २००७ साल. तेव्हा गोविंदाची जी परिस्थिती होती ती सलमानची ‘जुडवा’च्या वेळी होती, आणि ह्यावेळी सलमान अश्या स्थितीत होता ज्यावेळी गोविंदा ‘जुडवा’च्या वेळी होता. म्हणजेच सलमान स्टार बनला होता, आणि तर दुसरीकडे गोविंदा जो राजकारणात गेला होता. त्याचे वजन वाढले होते, केसं गळाली होती, तो पुन्हा बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी प्रयत्न करत होता. अश्यावेळी त्याला गरज होती एका चांगल्या चित्रपटाची. तेव्हा गोविंदाने सलमानला फोन केला आणि सांगितले, “भावा मला इंडस्ट्री मध्ये परत एंट्री करायची आहे. मला एका हिट चित्रपटाची गरज आहे. तू माझ्यासाठी काही करू शकतोस का.” तेव्हा सलमानने गोविंदाच्या एंट्रीसाठी प्लॅनिंग केली. त्याने गोविंदासाठी कॉमेडी प्रकारचा चित्रपट करायचे ठरवले. कारण गोविंदा कॉमेडी प्रकारच्या चित्रपटासाठी लोकप्रिय होता. आणि जर अश्यावेळी गोविंदाची एंट्री जर कोमिडी चित्रपटाने झाली तर त्याच्यासाठी ते योग्य ठरेल. हाच विचार करून सलमान खान गोविंदाचा फेव्हरेट दिग्दर्शक डेव्हिड धवन ह्यांच्याकडे गेला, जो कॉमेडी चित्रपटासाठी ओळखला जातो. याशिवाय गोविंदा आणि डेव्हिड धवनची जोडी जगजाहीर आहे.

सलमान आणि डेव्हिडची तोपर्यंत खूप चांगली मैत्री झाली होती. हीच ती वेळ होती जेव्हा डेव्हिड धवनला सलमान खानने ‘पार्टनर’ चित्रपट बनवायला सांगितले. जरी हा चित्रपट सलमान खानला डोळ्यासमोर ठेवून लिहिला होता, परंतु सलमानला आता गोविंदाला सुद्धा बॉलिवूडमध्ये पुन्हा लाँच करायचे होते. ह्यासाठी सलमानने ह्या चित्रपटातून स्वतःचा रोल कमी करवून घेतला. गोविदाचा रोल त्याच्या बरोबरीचा ठेवला. जो खूप कॉमेडी होता. हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा गोविंदा आणि सलमानची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. आणि हा चित्रपट हिट झाला. खरंतर तुम्ही बॉलिवूडमध्ये हे ऐकलं असेल कि लोकं एक दुसऱ्यांचे चित्रपट काढून घेतात, एकमेकांचे रोल कमी करतात. परंतु काही अशी लोकं सुद्धा आहेत बॉलिवूडमध्ये, जी एकमेकांसाठी स्वतःचे चित्रपटसुद्धा सोडतात. ह्या मोजक्या लोकांमध्ये गोविंदा, सलमान खान, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी आणि संजय दत्त ह्यांचे नाव येते. हि आठवण गोविंदाने स्वतः सांगितली. आम्ही तो व्हिडीओ येथे देत आहोत, तुम्ही नक्की बघा.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.